नवापूर तालुक्यातील 75 बचत गटांना मिळणार प्रत्येकी 10 शेळ्या एक बोकड; मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी गट निवड पत्रांचे वाटप
नंदुरबार - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवाक्त्या तथा संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र आदिवासी विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील बचत गटांना प्रत्येकी 10 शेळ्या आणि एक बोकड यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आज दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी नवापूर येथील शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या बचत गटातील महिला सदस्यांच्या भव्य मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी गट निवड पत्रांचे वाटप करुन या वाटपाचा आज शुभारंभ करण्यात आला.
आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या विद्यमाने महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत शेळी गट निवड पत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा संसद रत्न खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावीत, विधान परिषद सदस्य तथा उद्धव गटाचे शिवसेना नेते आमश्या पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती संगीताताई गावित, आदिवासी विकास विभागाच्या संचालिका लीना बनसोड तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी या प्रसंगी मोदी सरकारच्या महिला प्रणित विकास संकल्पनेला पुढे नेण्यासाठी आदिवासी भागातील सर्व महिला घटकाला स्वयंपूर्ण बनवणाऱ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शेळी वाटप हा त्याचाच भाग असून विविध उद्योग करून आत्मनिर्भर बनू पाहणाऱ्या बचत गटांच्या महिलांना याचा निश्चितच लाभ होणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी बचत गटांच्या माध्यमातून चाललेल्या कार्याचा गौरव करून आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांनी अन्य योजनांचा देखील लाभ घ्यावा त्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी इतर आदिवासी घटकांप्रमाणे महिलांना सुद्धा पाठबळ देण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आणि शेळीपालनाच्या माध्यमातून प्रत्येक घरातील महिला स्वयंरोजगार कसा कमवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले.

