🔴 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा...?
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कलम 52 व 53 अंतर्गत नोटीस, 30 दिवसांची मुदत
भुसावळ तालुक्यातील जामनेर रोड परिसरातील सर्वे नं. 115/1/अ, प्लॉट नं. 09 वरील माऊली प्लाझा इमारतीच्या बांधकामात गंभीर अनियमितता व मंजूर नकाशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 व 53 अन्वये संबंधित मालकास नोटीस बजावली आहे.
सहायक संचालक, नगररचना जळगाव यांच्या तपासणी अहवालात सदर इमारतीत मंजूर नकाशानुसार आवश्यक असलेली मोकळी जागा, सामाजिक अंतर, पार्किंग व्यवस्था व रॅम्प यांचे उल्लंघन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय इमारतीच्या वापरात परवानगीशिवाय बदल करण्यात आला असून, छतावर सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
नोटिसीनुसार, मंजूर नकाशा व भोगवटा प्रमाणपत्रातील अटी-शर्तींचे उल्लंघन करून अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, सदर बांधकाम तात्काळ हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधितांनी 30 दिवसांच्या आत स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून टाकावे, अन्यथा कलम 55 व 56 नुसार प्रशासनामार्फत कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.
दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी बजावण्यात आलेल्या या नोटिसीमुळे शहरातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, आगामी काळात इतर अनधिकृत बांधकामांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
