पंकज शिक्षक कार्य गौरव पुरस्काराने अजय सैदाने सन्मानित
चोपडा (प्रतिनिधी) : संदिप पाटील
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था चोपडा यांच्या तर्फे शैक्षणिक व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विशेष कार्य करणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयातील तंत्रस्नेही, क्रिकेटप्रेमी व इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे शिक्षक अजय रमेश सैंदाने यांना सन 2025 चा *पंकज शिक्षक कार्य गौरव पुरस्कार* संस्थेच्या रंग तरंग सांस्कृतिक महोत्सवात प्रदान करण्यात आला.
अजय सैंदाने सर अनेक वर्षांपासून शाळेत इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापन करत असून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य, आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. अध्यापनासोबतच त्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षणात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच संगणक निपुणतेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत *नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तर शिक्षक व अधिकारी स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वेळ देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
या सर्व शैक्षणिक, क्रीडा व नवोपक्रमात्मक कार्याची दखल घेऊन पंकज शिक्षक कार्य गौरव पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले व विद्यमान अध्यक्ष पंकज बोरोले यांच्या हस्ते सहपरिवार संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.अजय सैंदाने सर यांच्यावर विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक व शिक्षणप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
