Type Here to Get Search Results !

दैनंदिन जिवनात आपल्या बळावर समस्यांमधुन मार्ग काढून जिवन जगवणारी म्हणजे आई :- श्री राजू बाविस्कर

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 दैनंदिन जिवनात आपल्या बळावर समस्यांमधुन मार्ग काढून जिवन जगवणारी म्हणजे आई :- श्री राजू बाविस्कर


चोपडा प्रतिनीधी -आपल्या सगळ्यांचा जीवनात आईचे महत्व खूप असते. ती अनेक आघाड्यांवर लढत आपला संसार सांभाळते. एकूणच आपल्या समाजात स्त्रियांचे जीवन हे सर्वार्थाने वेगळे आहे. त्या दैनंदिन जगण्यात येणाऱ्या समस्या, अडचणी यावर स्वतः मार्ग शोधून मात करत जगतात आणि इतरांनाही जगवतात. त्यांच्यात असणारे हे शहाणपण, त्यांच्या अंगी असणारे बळ हीच आपल्या जागण्याची प्रेरणा आहे, असे सांगत आपला संघर्षमय प्रवास 'काळ्या निळ्या रेषा' या सर्वत्र चर्चा असणाऱ्या आत्मकथनाचे लेखक, चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव) यांनी उपस्थितांसमोर मांडला.
        चोपडा येथील नगर वाचन मंदिराच्या अमरचंद सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेची चोपडा शाखा व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त लेखक, चित्रकार राजू बाविस्कर यांच्याशी सुसंवाद आयोजित करण्यात आला होता. मसापचे प्रमुख कार्यवाह संजय बारी व वाचक प्रशांत गुरव यांनी राजू बाविस्कर यांची मुलाखत घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला. प्रारंभी लेखक राजू बाविस्कर, मसाप शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पाटील, डॉ. विकास हरताळकर, माधुरी मयूर, श्रीकांत नेवे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटिया यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. लेखक राजू बाविस्कर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे लेखन संजय बारी यांनी तर वाचन पंकज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गौरव महाले यांनी केले.
        चोपडा तालुक्यातील लासूर येथील मूळ रहिवासी असलेल्या राजू बाविस्कर यांनी या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक घटना मोकळेपणाने सांगितल्या. यावेळी ते म्हणाले, लहानपणापासूनच चित्र आणि रेषा याविषयी कमालीची उत्सुकता होती. चांगल्या मित्रांच्या सहवासातून ती उत्सुकता छंदामध्ये बदललेली. रेषा जीवनाचा भाग बनली. माझ्या चित्रांमध्ये आजूबाजूची माणसे, प्राणी, निसर्ग, दुःख प्रकर्षाने दिसते कारण मी जे बघितलं, जे जगलो या चित्रांमधून मांडले. माझ्या चित्रांमधील बिन चेहऱ्याची माणसे ही कोणा एका जातीचं, समाजाचं दर्शन नसून आपल्याकडील व्यवस्था दर्शवतात. भविष्यातही चित्रकार म्हणून ओळख आवडेल, असेही ते यावेळी म्हणाले.
         मी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक चांगल्या माणसांच्या संपर्कात आलो त्यांच्याकडून शिकत राहिलो. माणसांमध्ये राहून स्वतःला समृद्ध करत गेलो. चित्रकला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास लाभल्याने आपली जडणघडण होत गेली आणि त्यांच्याच प्रेरणेतून 'काळ्या निळ्या रेषा' हे आत्मकथन लिहिले गेले, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
       या गप्पांमध्ये राजू बाविस्कर यांनी लासुरमधील बालपणीचे अनेक प्रसंग, आलमगीरच्या पानटपरीवरील चित्रे ते जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित झालेली चित्रे, बँडपार्टी, दुधमाय, चोपडा शहरातील आठवणी त्यांनी प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देताना सांगितल्या. यावेळी मसाप सदस्य व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable