*पंकज विद्यालयाचा रंगतरंग सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न*
चोपडा | प्रतिनिधी संदिप पाटील
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था, चोपडा संचलित पंकज बालसंस्कार केंद्र (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगतरंग’ हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव दि. २२ ते २४ डिसेंबर दरम्यान पंकज विद्यालय, चोपडा येथील भव्य मैदानावर अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून अजित पाटील (गटशिक्षणाधिकारी, पं.स. चोपडा), केंद्रप्रमुख दीपक पाटील, देवेंद्र पाटील, राकेश पाटील, विवेक पाटील उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब ज्ञानेश्वर शेवाळे (गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०) व शुभांगी ताई सूर्यवंशी (अध्यक्षा, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
तिसऱ्या दिवशी नम्रता सचिन पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्षा, न.प. चोपडा), विकास पाटील (माजी उपनगराध्यक्ष), नरेंद्र वसंतराव पाटील (सभापती, कृ.उ.बा.स. चोपडा) यांच्यासह चोपडा बाजार समितीचे संचालक, सर्व नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, सचिव गोकुळ भोळे, सौ. हेमलता बोरोले, सौ. दिपाली बोरोले तसेच परिवारातील सदस्यांची उपस्थिती लाभली.
या दिमाखदार कार्यक्रमात विद्यालयातील विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला. तसेच चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नम्रता पाटील व सर्व नगरसेवकांच्या विजयाबद्दल संस्थेच्या वतीने मानचिन्ह देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
‘रंगतरंग’ कार्यक्रमात रांगोळी सुशोभनातून सामाजिक संदेश देण्यात आला. साने गुरुजी यांच्या जीवनातील विविध गुणांचा परिचय करून देणारे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. बालकांनी विविध हिंदी-मराठी गीतांवर मनमोहक नृत्ये सादर केली. कौटुंबिक नृत्य, शिक्षकांनी सादर केलेले “आजचे विद्यार्थी – उद्याचे भविष्य” या संकल्पनेवरील थीम नृत्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्राथमिक विभागातर्फे शेतकरी नृत्य, सावरिया सेठ, कृष्ण मुरारी, ऋषी कपूर यांना आदरांजली, महाभारत थीम नृत्य, जोकर थीम साँग, गणेश वंदना, बायलोने, राजाचे राजपण आदी कार्यक्रम सादर झाले. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कानबाई गीते, भांगडा, मराठी-हिंदी रिमिक्स, ऑपरेशन सिंदूर गीत तसेच शेवटी ‘वाट लावू या’ या गाण्यावर आधारित विनोदी नाटिकेने प्रेक्षकांची दाद मिळविली.
कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल वाचन मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी केले. विद्यार्थी व पालक सत्काराचे नियोजन मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. यावर्षीचा ‘पंकज शिक्षक गौरव पुरस्कार’ संचालक मंडळाच्या हस्ते अजय रमेश सैदाने यांना सहपरिवार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून पालक, शिक्षक व नागरिकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. महोत्सव यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
