बाप्पा पाठोपाठ गौरींचे शहादा नगरीत आगमन
दि.२२-९-२०२३
नंदुरबार जिल्हा -पल्लवी प्रकाशकर
शहादा शहरात गणेशोत्सव सर्वत्र साजरा होत असतांनाच महालक्ष्मी गौरींचे देखील आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
*शास्त्र काय म्हणते*?
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजे गौरीची चित्रे किंवा आपल्या परंपरेनुसार चिन्हे ठेवली जातात. ज्येष्ठ नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करुन महानैवेद्य दाखवले जाते. तिसर्या दिवशी ते मूळ नक्षत्रात गौरीचे विसर्जन करण्यात येते. गौरीला महालक्ष्मी ही म्हटलं जाते आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असे संबोधले जाते.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते.
शहादा शहरातील बांधकाम व्यावसायिक श्री प्रदीप आंबेकर यांच्या घरी महालक्ष्मी गौरींचे मोठ्या उत्साहाने आगमन झाले आहे.गौंरीच्या दर्शनासाठी परिसरातील सुवासिनींनी एकच गर्दी केली होती .


0 टिप्पण्या