भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातर्फे 'महोत्सव विठ्ठलाचा-महागजर माऊलीचा'; चोपड्यात रंगणार दिंडी आणि रिंगण सोहळा
चोपडा प्रतिनीधी-संदिप पाटील-

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीविठ्ठलाच्या जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त दि.१६, मंगळवार रोजी सकाळी ९.०० वा. येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातर्फे भव्य दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी निमित्त राज्यात भक्तिमय वातावरण असते. प्रत्येकाच्या मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते पण प्रत्येकाला चंद्रभागेच्या तीरावरील विठुरायाचे दर्शन घेणे शक्य नसते. शहर व तालुक्यातील भाविकांना हा आनंद अनुभवता यावा म्हणून गेल्या वर्षाप्रमाणे भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील विविध विभागांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याचा आरंभ सकाळी ९.०० वा. पालखी पूजनाने होणार असून
शहराच्या मुख्य मार्गावरुन दिंडी निघणार आहे. त्यानंतर महिला मंडळ शाळेच्या प्रांगणात सकाळी १०.०० वा.अश्व रिंगण, गाईचे, बैलाचे, कलशधारी महिला- मुलींचे, तुळसधारी महिलांचे, भागवत पताकाधारी, बालवारकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे रिंगण रंगणार आहे. तसेच श्री विठ्ठलाची महाआरती होणार आहे. या सोहळ्यानिमित्त ललित कला केंद्रातर्फे श्री पांडूरंगाच्या महारांगोळीचे प्रदर्शन होणार आहे. यावेळी शाळेच्या प्रांगणात कांदा-कैरी बाजार भरविण्यात येणार आहे.
विठ्ठलाच्या गजरात व रिंगण सोहळ्यात सहभागी होवून माऊलीच्या जयघोषात भक्तीरंगाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भगिनी मंडळाच्या अध्यक्ष सौ.पूनम आशिष गुजराथी यांनी केले आहे.
0 टिप्पण्या