भुसावळ येथील 'माऊली प्लाझा'वर हातोडा पडण्याची शक्यता; प्रशासनाकडून ५ फेब्रुवारीला संयुक्त मोजणी व पाहणी
भुसावळ:- पोलीसराज मिडिया
जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या 'माऊली प्लाझा' इमारतीमधील अनधिकृत बांधकामाबाबत आता महसूल आणि नगररचना विभाग आक्रमक झाला आहे. मंजूर नकाशाचे उल्लंघन करून करण्यात आलेले अतिरिक्त बांधकाम ३० दिवसांत न हटवल्यामुळे, आता ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासकीय पथकाद्वारे या इमारतीची प्रत्यक्ष मोजणी आणि तांत्रिक पाहणी केली जाणार आहे. यानंतर सदर अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील स.नं. ११५/१/अ, प्लॉट नं. ०९ येथील जमीन मालक श्री. रविंद्र वामनराव तळेले यांनी वाणिज्य व रहिवास प्रयोजनार्थ सुधारित बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळवण्यासाठी अर्ज केला होता. सहायक संचालक, नगररचना जळगाव यांच्या शिफारशीनुसार ८ मार्च २०२३ रोजी त्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, भोगवटा प्रमाणपत्र देताना ज्या १३ अटी व शर्ती घातल्या होत्या, त्यांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचे समोर आले आहे.
प्रशासकीय नोटीस आणि दुर्लक्ष
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ (ड) नुसार, मंजूर नकाशात फेरफार केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने श्री. तळेले यांना कलम ५३ अन्वये नोटीस बजावली होती. सदर अनधिकृत बांधकाम ३० दिवसांच्या आत स्वतःहून काढून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुदत उलटूनही बांधकाम काढले गेले नाही आणि नोटिशीला कोणताही खुलासा सादर करण्यात आला नाही.
५ फेब्रुवारीला 'या' विभागांचे पथक येणारआता कलम ५५ व ५६ अन्वये कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ९ जुलै २०२५ च्या तांत्रिक अहवालातील त्रुटींची शहानिशा करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता खालील विभागांचे अधिकारी 'माऊली प्लाझा' येथे हजर राहणार आहेत:१. सहायक संचालक, नगररचना, जळगाव.२. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुसावळ.३. तालुका भूमी अभिलेख (मोजणी प्रतिनिधी).४. महसूल विभाग (मंडळ अधिकारी व तलाठी).
पुढील पाऊल काय?
या संयुक्त पाहणीत बांधकामाचे प्रत्यक्ष मोजमाप केले जाईल. अटींचे उल्लंघन सिद्ध झाल्यास, सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण खर्च संबंधित जमीन मालकाकडून वसूल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे जामनेर रोड परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या