जळगाव महापालिकेत भाजपाची संघटनात्मक बांधणी पूर्ण

Advertisement

जळगाव महापालिकेत भाजपाची संघटनात्मक बांधणी पूर्ण

जळगाव महापालिकेत भाजपाची संघटनात्मक बांधणी पूर्ण

प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेतापदी प्रकाश बालाणी

जळगाव : प्रतिनिधी , प्रमोद पाटिल सह संपादक
जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, भाजपाच्या महापालिका गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रतोदपदी नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपगटनेतेपदाची जबाबदारी अनुभवी नगरसेवक नितीन बरडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे तब्बल 46 नगरसेवक निवडून आल्याने भाजप हा महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर गटनिर्णयासाठी हालचालींना वेग आला होता.

नाशिक येथे गटनिर्णय, विभागीय आयुक्तांकडे नोंदणी
भाजपाच्या महापालिका गटनोंदणीसाठी सर्व नगरसेवक बुधवारी नाशिक येथे दाखल झाले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

 यानंतर गटनेतापदी प्रकाश बालाणी यांच्या नावावर सर्वानुमते एकमत झाले. त्यानुसार भाजपाच्या महापालिका गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली.

युवा नेतृत्वाला संधी
प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेले नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील हे महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आले असून, त्यांची प्रतोदपदी निवड करून भाजपाने युवा नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. प्रतोदपदासारखी महत्त्वाची जबाबदारी युवा नगरसेवकाकडे सोपविल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष
दरम्यान, गुरुवारी मंत्रालयात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून, या सोडतीकडे संपूर्ण शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी कोणाचा दावा बळकट होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गटनेते, उपगटनेते व प्रतोदपदाच्या निवडी पूर्ण करत भाजपाने महापालिकेतील सत्तास्थापनेची दिशा स्पष्ट केली असून, आगामी काळात महापालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातमी लेखन : प्रमोद ज.पाटिल (भुसावळ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या