‘एआय’च्या (AI) स्वप्नापेक्षा माती वाचवण्याची भूमिका घ्या; शेतकऱ्यांची सरकारला चपराक!
पुणे/प्रतिनिधी: पोलीसराज मिडिया
"शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात खर्चही फिटेना झाला आहे. आता सरकार 'एआय' (Artificial Intelligence) क्रांतीच्या गप्पा मारत आहे. पण आम्हाला 'एआय'च्या हवेतील स्वप्नांपेक्षा काळजाच्या तुकड्यासारखी जपलेली माती आणि शेती वाचवण्याची खरी गरज आहे," अशा शब्दांत शेतकरी अभ्यासक एस. बी. नाना पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
योजनांच्या कागदी घोड्यावर कडाडून हल्ला
नाना पाटील यांनी आजवरच्या विविध योजनांमधील फोलपणा पुराव्यासह मांडला आहे. "२०२२ मध्ये उत्पन्न दुप्पट होणार होते, त्याचे काय झाले? नैसर्गिक आणि जैविक शेतीच्या नावाने केवळ पुरस्कारांचे राजकारण झाले, पण प्रत्यक्षात शेत मात्र ओसाड पडत आहे. खते आणि औषधांच्या लॉटरी काढल्या जातात, लाखो शेतकरी अर्ज करतात आणि पदरात मात्र निराशाच पडते," असे त्यांनी म्हटले आहे. किसान सन्मान आणि नमो सन्मान सारख्या योजनांच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च होतो, मात्र प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
जाहिरातीतील मुलं जिंकली, पण मातीतील शेतकरी हरला
एका मार्मिक उदाहरणाद्वारे पाटील यांनी कंपन्यांच्या जाहिरातींवर निशाणा साधला. "गेल्या ४० वर्षांपासून आपण जाहिरातींमध्ये 'आरोग्यवर्धक पेये' पिणारी मुलं जिंकताना पाहतोय, पण प्रत्यक्षात मैदानात बाजी मारतो तो ग्रामीण भागातील 'भाजी-भाकरी' खाणारा मुलगाच! हेच सत्य शेतीलाही लागू होते. तंत्रज्ञान नक्कीच हवे, पण ते मातीचा कस वाढवणारे आणि शेतकऱ्याचा खिसा भरणारे असावे," असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख समस्या आणि धोक्याचा इशारा:
- विषमुक्त शेतीची गरज: जमिनीचा पोत घसरत असून अन्नातून विष पोटात जात आहे. यामुळे कॅन्सर आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.
- घटते बजेट: कृषी क्षेत्रावरील बजेटचे प्रमाण वर्षागणिक कमी होत असून दावे मात्र 'सुजलाम सुफलाम'चे केले जात आहेत.
- अमेरिका करार: 'घरना उघडा आणि याहीन ले लुगडा' अशी अवस्था अमेरिकेसोबतच्या करारामुळे होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
"AI शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल की शाप, हे काळच ठरवेल. पण जर सरकारने शेती आणि शेतकऱ्यांकडे असेच दुर्लक्ष केले, तर विषारी अन्न खाऊन हा देशच शिल्लक राहणार नाही," असा गंभीर इशाराही पाटील यांनी लेखाच्या शेवटी दिला आहे.
0 टिप्पण्या