भ्याड हल्ल्याने पत्रकाराची लेखणी थांबणार नाही; मारेकरी व सूत्रधारांना तात्काळ अटक करा!
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचा संताप; 'कटा'ची चौकशी करण्याची पोलिसांकडे मागणी
उल्हासनगर | (विशेष प्रतिनिधी)
पोलीसराज मिडिया - संदिप पाटील
"माझ्यासारख्या निशस्त्र आणि ज्येष्ठ पत्रकारावर दिवसाढवळ्या हल्ला करणे ही कसली मर्दूमकी? हा हल्ला केवळ माझ्यावर नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला सुनियोजित कट आहे. मशालीची ज्योत कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी ती विझण्याऐवजी अधिक प्रखरतेने उफाळून येईल," अशा शब्दांत उल्हासनगरचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दिवसाढवळ्या गजबजलेल्या रस्त्यावर हल्ला
काही दिवसांपूर्वी मालवणकर यांच्यावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात मारेकऱ्यांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली होती. विना-नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या या सराईत गुंडांनी मालवणकर यांची स्कूटर अडवून त्यांना खाली पाडले आणि गंभीर दुखापत केली. यामध्ये त्यांच्या हातापायाला दुखापत झाली असून 'फ्रॅक्चर' झाले आहे. हा हल्ला पूर्वनियोजित रेकी करून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजकीय सूडबुद्धीचा संशय
आपल्या लेखणीचा सामना करू न शकणाऱ्या विरोधकांनी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब केल्याचे मालवणकर यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, "भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अनाहूत सल्ला" या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात एका विशिष्ट विषयावर मांडलेल्या भूमिकेमुळे हा सूड उगवण्यात आला असावा, असा दाट संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
मालवणकर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना खालील मागण्या केल्या आहेत:
- कलम १२० (ब) अंतर्गत कारवाई: हा हल्ला एका मोठ्या कटाचा भाग असल्याने सूत्रधारांना ताब्यात घेऊन चौकशी करावी.
- सूत्रधारांची अटक: मारेकरी बाहेरगावचे असण्याची शक्यता असून, त्यांना आश्रय देणाऱ्या मुख्य सूत्रधारांना अटक केल्याशिवाय मारेकऱ्यांचा ठावठिकाणा लागणार नाही.
- राजकीय दबाव झुगारा: पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करावा.
पत्रकार संघटनांचा पाठिंबा
या कठीण प्रसंगी अनेक पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मालवणकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. "माझ्या लेखणीला पूर्णविराम केवळ माझ्या अंतानंतरच मिळेल," असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी ही कायदेशीर लढाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
"तेरे हाथ में तलवार है मेरे हाथो कलम, बोल सर जुल्मो का तू काटेगा या मै काटू?"
— ही शायरी उद्धृत करत त्यांनी हल्लेखोरांना आणि त्यांच्या आकांना थेट आव्हान दिले आहे.
0 टिप्पण्या