भक्तीचा मुखवटा, भूमाफियांचा धंदा! सार्वजनिक जागेवर उभारले गोडाऊन अन् गोठा.
मंदिराच्या नावाखाली गोठा आणि गोडाऊनचे साम्राज्य; प्रांत अधिकाऱ्यांनी बजावली ‘कारणे दाखवा’ नोटीस
भुसावळ (विशेष प्रतिनिधी):
भुसावळ शहरात शासकीय ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर आणि भक्तीच्या नावाखाली एका बिल्डरने चक्क सार्वजनिक जागा बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
शहरातील सर्वे क्रमांक ११५/१/अ मधील जागा मूळतः नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि महिलांच्या वापरासाठी ‘ओपन स्पेस’ म्हणून राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, तक्रारदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या जागेचा सुमारे ९० टक्के भाग ‘श्री समर्थ महिला बहुद्देशीय संस्था’ संचलित ‘श्री संत गजानन महाराज देवस्थान’ च्या नावाखाली अतिक्रमित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी खालीलप्रमाणे गैरप्रकार सुरू आहेत
बागेसाठी राखीव असलेल्या जागेवर जनावरांचा गोठा आणि सिमेंटसह बांधकाम साहित्य साठवण्यासाठी मोठे गोडाऊन उभारण्यात आले आहे. परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे परिसरातील महिलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.नागरिकांनी आपल्या हक्काच्या जागेची मागणी केल्यास त्यांना ‘धर्मविरोधी’ ठरवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) जितेंद्र पाटील यांनी संबंधित संस्थेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये परवानगी, देणगीचा हिशेब, सीसीटीव्हीचा वापर आणि शासकीय जागेवरील गोठ्याच्या कायदेशीरतेबाबत एकूण १० गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
संबंधित संस्थेच्या संचालकांना १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर या सुनावणीला कोणी गैरहजर राहिल्यास, प्रशासन एकतर्फी कारवाई करेल असा इशाराही प्रांत अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे संपूर्ण भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या हक्काची ही ‘ओपन स्पेस’ पुन्हा मोकळी होणार की अतिक्रमणाला पाठबळ मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या