मुख्य संपादक: संदिप पाटील
चोपडा: शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी असलेल्या ट्राफिक पोलिसांचा मनमानी कारभार आता सामान्य नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. अवैध वसुली, दमदाटी, आणि चक्क अंगझडती घेण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली असून, चोपडा शहरात सध्या 'खाकी'ची दहशत निर्माण झाली आहे.
वैकुंठधाम परिसरात वसुलीचा 'अड्डा'
शहरातील वैकुंठधाम परिसर सध्या ट्राफिक पोलिसांच्या वसुलीचे केंद्र बनले आहे. येथे पोलिसांकडून वाहनांच्या रांगा लावल्या जातात. कागदपत्रांच्या नावाखाली वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून बेकायदेशीर पैशांची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास शिवीगाळ, उद्धट भाषा आणि मानसिक छळ केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
शिवाजी महाराज चौकात वाहतुकीचा खोळंबा, पोलिसांचे दुर्लक्ष
एकीकडे वसुलीसाठी पोलीस तत्पर असताना, शहरातील मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मात्र वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला आहे. येथे रोज भीषण वाहतूक कोंडी होते, मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. "पोलिसांना वाहतूक नियंत्रण करायचे आहे की फक्त वसुली?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
"दादा, बकरा आला आहे!" – संशयास्पद कारवायांचा पर्दाफाश
कुंटणखाणा परिसरात ट्राफिक पोलिसांचा वावर संशयास्पद ठरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार:
• ड्युटी मुख्य चौकात असताना पोलीस दिवसातून ४-५ वेळा या परिसरात फेरफटका मारतात.
• बाहेरील पासिंगची (MH-19 सोडून) वाहने दिसताच खबऱ्यांमार्फत पोलिसांना "दादा, बकरा आला आहे" असा फोन केला जातो.
• त्यानंतर संबंधित वाहनचालकाला गाठून त्याची मोठी लूट केली जाते.
•
आयजी साहेबांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष
येत्या ४ तारखेला पोलीस महानिरीक्षक (I.G.) चोपडा शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पाहणीसाठी येत आहेत. आतापर्यंत केवळ लक्ष्मण शिंगाणे नावाच्या एका कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे, परंतु वसुलीच्या या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर मोठ्या माशांवर कारवाई होणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
नागरिकांचा सवाल: "रक्षकच जर भक्षक बनले असतील, तर आम्ही दाद कोणाकडे मागायची?"
जर आयजी साहेबांच्या दौऱ्यात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर चोपड्यातील नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या