तांदळवाडी:- संदिप पाटील
दि.३१/१/२०२६
परंपरेचा वारसा आणि भक्तीचा उत्साह जोपासत तांदळवाडी येथील चांग सुलतान देवाचा यात्रोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. या उत्सवाच्या निमित्ताने गावाची जुनी परंपरा आणि कै. दौलत बा भगत यांच्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी घालून दिलेल्या आदर्शाचे स्मरण करत ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवले.
कै. दौलत बा भगत श्रद्धेचा आणि सेवेचा आधारस्तंभ
कै. दौलत बा भगत यांचे मंदिर कार्याप्रति असलेले समर्पण आजही भाविकांच्या स्मरणात आहे. त्यांच्याकडे चांग सुलतान देवाची 'गुढी' ठेवण्यासाठी केवळ तांदळवाडीतूनच नव्हे, तर दूरवरच्या खेड्यापाड्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असत. पौर्णिमा, अमावास्या आणि विशेष तिथींना त्यांचे आध्यात्मिक कार्य अविरत चालत असे.
विशेष म्हणजे, रात्रभर घुमून (अंगात देव येऊन) सुद्धा न थकणाऱ्या देवाच्या त्या रूपाला पाहून भाविक नतमस्तक होत असत. श्रद्धेच्या या शक्तीमुळेच आजही तांदळवाडीच्या यात्रेला एक वेगळे आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे.
डिजिटल क्रांतीतही लोककलेची मोहिनी
आजचे युग हे डिजिटल मनोरंजनाचे असले तरी तांदळवाडीच्या यात्रेतील तमाशाचे आकर्षण आजही कायम आहे. बदलत्या काळानुसार मनोरंजनाची साधने बदलली असली, तरी पारंपारिक तमाशा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. कै. दौलत भगत यांच्या काळापासून चालत आलेला हा यात्रेचा उत्साह आजही तितक्याच जोमाने टिकून असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रशासकीय नियोजन व ग्रामस्थांचा पुढाकार
यात्रोत्सवात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तांदळवाडी ग्रामपंचायत, यात्रा कमिटी आणि स्थानिक तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. शांतता व सुव्यवस्थेसाठी नागरीकांनी परीश्रम घेतले.
"अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रोत्सवामुळे गावात आनंदाचे वातावरण असते. कै. दौलत बा भगत यांच्यासारख्या थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उत्सव आम्ही सामाजिक एकता आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून पुढे नेत आहोत."
— गोपाल नवल धनगर ग्रामस्थ, तांदळवाडी
0 टिप्पण्या