भुसावळ (प्रतिनिधी):
शहराच्या हद्दीबाहेरील सर्वे क्रमांक ११५/१/अ मधील मंजूर नकाशातील 'ओपन स्पेस'वर करण्यात आलेले बेकायदेशीर पत्री शेड आणि सिमेंट गोडाऊनचे अतिक्रमण ३० दिवसांच्या आत हटवण्यात यावे, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी, जळगाव यांना देण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
भुसावळ शहर हद्दीलगत असलेल्या सर्वे क्र. ११५/१/अ मध्ये मंजूर नकाशाप्रमाणे सार्वजनिक वापरासाठी मोकळी जागा (ओपन स्पेस) सोडण्यात आली आहे. मात्र, या जागेचा मूळ उद्देश डावलून त्या ठिकाणी काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या भव्य पत्री शेड आणि सिमेंट साठवणुकीसाठी गोडाऊन उभारले आहे. हे बांधकाम पूर्णपणे नियमबाह्य असून यामुळे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या:
• मंजूर नकाशातील मोकळ्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे.
• नियमबाह्य सिमेंट गोडाऊनवर प्रशासकीय कारवाई करावी.
• सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित विभागाला आदेश द्यावेत.
प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
प्रमोद पाटील यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक हितासाठी राखीव असलेल्या जागेवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. जर येत्या ३० दिवसांत हे अतिक्रमण प्रशासनाने हटवले नाही, तर उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे उपोषण करण्यात येईल.आम्ही पती आणी पत्नी दोघेही या उपोषणास बसु अशी माहीती त्यांना पत्रकारांना दिली.
या निवेदनामुळे भुसावळ परिसरात अनधिकृत बांधकामांचा आणि ओपन स्पेसच्या वापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या