भुसावळ येथील श्रद्धा नगरात अतिक्रमणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर; रहिवाशाचा 'खटिया टाको' आंदोलनाचा इशारा
भुसावळ: येथील हद्दीबाहेरील सर्वे क्रमांक ११५/१/अ, श्रद्धा नगर (संत गजानन महाराज देवस्थान परिसर) येथे वाढत्या अतिक्रमणामुळे आणि पसरलेल्या अस्वच्छतेमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने, संतप्त नागरिक प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी आता थेट प्रांत कार्यालयासमोर 'खटिया टाको' आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नेमका प्रकार काय?
श्रद्धा नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे, सिमेंट गोडाऊन, अनधिकृत संडास-बाथरूम आणि गुरेढोरे बांधण्यासाठी मोठमोठे गोठे (शेड) उभारले गेले आहेत. या अतिक्रमणामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
आरोग्य धोक्यात: तीन जणांना त्वचारोगाची लागण
परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तक्रारदार प्रमोद पाटील यांच्यासह अन्य दोन रहिवाशांना गंभीर त्वचारोगाची लागण झाली आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार, एखाद्या विषारी कीटक चावल्यामुळे हा संसर्ग वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असह्य वेदना आणि शारीरिक त्रासामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
प्रशासनाला शेवटचा इशारा
या संदर्भात जिल्हाधिकारी (जळगाव) आणि उपविभागीय अधिकारी (भुसावळ) यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की:
"माझी मागणी वैयक्तिक द्वेषातून नसून सार्वजनिक आरोग्य आणि कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी आहे. जर प्रशासनाने तातडीने वस्तुस्थितीची पाहणी करून अतिक्रमण हटवले नाही, तर मला प्रांत कार्यालयासमोर खटिया टाकून तीव्र आंदोलन करावे लागेल. यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील."
आता प्रशासन या गंभीर आरोग्य समस्येकडे आणि वाढत्या अतिक्रमणाकडे लक्ष देऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या