पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

Advertisement

पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर
चोपडा | प्रतिनिधी संदिप पाटील 
अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाज मंडळाच्या वतीने काल, १५ मार्च रोजी जनसेवा हॉस्पिटल, चोपडा येथे 'समाज चिंतन बैठकी'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बैठकीत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी १२ महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.

विवाह पद्धतीत मोठे बदल आणि शिस्त
​बैठकीत समाजातील पारंपरिक विवाह पद्धतीवर सखोल चर्चा करण्यात आली. मुलींचे इतर समाजात होणारे विवाह हे सामाजिक शोषणाचे प्रकार असल्याचे मानून त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, लग्नातील 'देजा' (हुंडा/दहेज) प्रथेसाठी ₹२५,६८२ आणि एक बकरा अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नातेसंबंधातील व्यवहारासाठी ५०० ते १००० रुपयांची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

परंपरांना प्राधान्य, आधुनिक विकृतींना फाटा
​समाजातील सण, उत्सव आणि लग्नांमध्ये होणारा डीजेचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, केवळ पारंपरिक वाद्यांच्या गजरात कार्यक्रम साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, बालविवाह रोखण्यासाठी १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलगा यांच्या विवाहास पंचमंडळाने कडक विरोध दर्शवला आहे.
बैठकीतील प्रमुख ठराव एका दृष्टिक्षेपात:
• ​आरक्षणाचा प्रश्न: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पावरा-बारेला समाजाच्या जनजातीय अनुसूचीतील विसंगती दूर करण्यासाठी जनजातीय आयोग व राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करणार.
• ​प्रतिष्ठा रक्षण: होळी, भोंगऱ्या, इंदल यांसारख्या सणांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर 'अॅट्रॉसिटी' अंतर्गत कारवाई करणार.
• ​शिक्षण व स्थलांतर: शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणणार आणि मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची ग्राम समितीकडे नोंदणी अनिवार्य करणार.
• ​पर्यावरण व व्यसनमुक्ती: 'प्लास्टिकमुक्त गाव' आणि 'व्यसनमुक्त समाज' मोहिमेसाठी विशेष समित्यांची स्थापना करणार.
• ​जागतिक आदिवासी दिवस: ९ ऑगस्ट रोजी हा दिवस पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून साजरा करण्याचा निर्णय.
​"समाजाची एकता, संस्कृती आणि सर्वांगीण प्रगतीसाठी हे ठराव मैलाचा दगड ठरतील. प्रत्येक गावाने ग्राम समितीच्या माध्यमातून या निर्णयांची अंमलबजावणी करावी."
नामदेव पटले (अध्यक्ष) व डॉ. चंद्रकांत बारेला (सह सचिव)

​सदर बैठकीला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले, सह सचिव डॉ. चंद्रकांत बारेला यांच्यासह विविध गावांतील पाटील, पंचमंडळी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या