भुसावळ (प्रतिनिधी):
येथील जामनेर रोडवरील वादग्रस्त ठरलेल्या इमारतीचा प्रशासकीय पंचनामा पूर्ण झाला असून, ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या या तीन पानी तपासणी अहवालात बिल्डरचे मोठे कारनामे समोर आले आहेत. मंजूर नकाशात दाखवलेली पार्किंग गिळंकृत करून तिथे व्यावसायिक दुकाने थाटल्याचा आणि सुरक्षा नियमांची पायमल्ली केल्याचा स्पष्ट ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.
पंचनाम्यातील ५ मोठे खुलासे:
१. पार्किंगचा केला बाजार: मंजूर नकाशानुसार तळमजल्यावर (Base) संपूर्ण पार्किंग आणि ३ मीटरचा रॅम्प प्रस्तावित होता. मात्र, प्रत्यक्षात पूर्व दिशेला ५ दुकाने, दक्षिण दिशेला १ दुकान आणि केवळ २ मीटरचा रॅम्प बांधून पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
२. लिफ्टचा केवळ दिखावा: इमारतीमध्ये लिफ्ट बसवणे अनिवार्य असताना, प्रत्यक्षात लिफ्टसाठी असलेली जागा भिंतीने कायमस्वरूपी बंद (Enclosed) करण्यात आली आहे. रहिवाशांच्या सोयीपेक्षा बांधकामाच्या जागेचा फायदा घेण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे.
३. जिन्याचे अनधिकृत बांधकाम: मंजूर नकाशात ज्या पद्धतीने जिना प्रस्तावित होता, तशा पद्धतीचे बांधकाम जागेवर दिसून आलेले नाही. तांत्रिकदृष्ट्या हे बांधकाम नियमांचे उल्लंघन करणारे आहे.
४. सामासिक अंतरात अतिक्रमण: इमारती भोवतीची मोकळी जागा (Margin Space) सोडून तिथेही पत्री शेड सिमेंट गोडाऊनचे बांधकाम करण्यात आले असून, तिथे गुरांचा वावर दिसून आला. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची गाडी जाण्यासही अडथळा निर्माण झाला आहे.
५. विनापरवाना मोबाईल टॉवर: इमारतीच्या गच्चीवर विनापरवाना मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे, ज्याची कोणतीही नोंद किंवा परवानगी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही.
दोन तास चालली तपासणी
हा पंचनामा ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० ते १:५७ या वेळेत करण्यात आला. यावेळी तक्रारदार प्रमोद जगन्नाथ पाटील, पंच आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. १० फूट ५ इंच उंचीची तळमजल्यावरील दुकाने आणि साडेचार फूट उंचीचा साऊंड प्लॅटफॉर्म अशा अनधिकृत बाबींची मोजणी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
आता या पुराव्यांनिशी तयार झालेल्या तीन पानी अहवालामुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून, प्रशासन ही अनधिकृत दुकाने जमीनदोस्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण दिशा: या बाजूने मंजूर नकाशानुसार ३ मीटरचा रॅम्प अपेक्षित होता, मात्र प्रत्यक्षात केवळ २ मीटरचा रॅम्प आढळून आला आहे. उर्वरित जागेत नियमबाह्य पद्धतीने १ दुकान बांधण्यात आले आहे. तसेच या बाजूने गेलेल्या हायटेंशन वायरमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
0 टिप्पण्या