अमरावती/नागपूर:
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. ॲड. सपना जाधव यांनी आरोपीच्या वतीने केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
बडनेरा येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्याने ११ सप्टेंबर २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारनुसार, त्यांची १० वर्षीय मुलगी कामावरून परतत असताना आरोपी विशाल बालबेल याने तिला फुले तोडण्याच्या बहाण्याने शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३२४ आणि पोक्सो (POCSO) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सत्र न्यायालयाचा निकाल:
अमरावती येथील विशेष सत्र न्यायालयाने (विशेष खटला क्र. २४८/२०२०) सरकार पक्षाचे ६ साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे २९ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी विशाल बालबेल याला दोषी ठरवून २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.
उच्च न्यायालयातील युक्तिवाद:
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आरोपीने ॲड. सपना जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे आव्हान दिले. सुनावणी दरम्यान ॲड. जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की:
• साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आणि तफावत आहे.
• वैद्यकीय अहवालानुसार, पीडितेच्या शरीरावर कोठेही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत.
• सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरोपीचे पीडितेच्या मोठ्या चुलत बहिणीशी प्रेमसंबंध होते. आरोपी गरीब असल्याने आणि सर्पमित्र (साप पकडण्याचे काम) असल्याने मुलीच्या कुटुंबाचा त्यांच्या विवाहास विरोध होता.
• दोघे पळून जाणार असल्याची कुणकुण लागताच, आरोपीला अडकवण्यासाठी पीडितेच्या वयाचा गैरवापर करून ही खोटी तक्रार नोंदवण्यात आली होती.
न्यायालयाचा निर्णय:
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ॲड. सपना जाधव यांचा बचाव ग्राह्य धरला. न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपीवरील आरोप सिद्ध होण्यास ठोस पुराव्यांचा अभाव आहे. परिणामी, आरोपी विशाल बालबेल याची सर्व आरोपांतून मुक्तता करत त्याची निर्दोष सुटका करण्याचे आदेश दि. ६ मार्च २०२६ रोजी पारित केले.
0 टिप्पण्या