जळगावकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका! जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी): गेल्या काही तासांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये आणि पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रशासनाचा खुलासा: इंधन पुरवठा साखळी सुरळीत
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या इंधनाबाबत पसरत असलेल्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. जळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी पेट्रोल व डिझेलचा नियमित साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे. संबंधित यंत्रणांमार्फत सातत्याने यावर लक्ष ठेवले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलेल्या 'या' महत्त्वाच्या सूचना:
१. अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडियावरील कोणत्याही अप्रमाणित संदेशावर विश्वास ठेवू नका.
२. साठा करणे टाळा: इंधनाचा तुटवडा होईल या भीतीने अनावश्यक साठा करू नका किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात इंधन खरेदी करू नका.
३. गर्दी टाळा: पेट्रोल पंपावर गर्दी करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.
४. अधिकृत माहिती: कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरून मिळालेल्या माहितीचाच आधार घ्या.
अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट ताकीद दिली आहे की, इंधन टंचाईबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. अशा खोटी माहिती पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रशासनाने नागरिकांना शांतता, संयम आणि सहकार्य राखण्याचे आवाहन केले असून घाबरून न जाता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचे सुचवले आहे.
वेगाने घडणाऱ्या घडामोडींसाठी पाहत राहा - 'पोलीसराज मीडिया'
0 टिप्पण्या