चोपडा: पीक विमा योजनेच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने थेट १३ सीएससी (CSC) सेंटर संचालकांवर कायदेशीर बडगा उगारला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आता सीएससी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
२३ कोटींचा घोटाळा; सॅटेलाईट पडताळणीत फुटले बिंग
मिळालेल्या माहितीनुसार, 'अंबिया बहार' केळी पीक विमा योजनेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात केळीचे पीकच नव्हते,सिएससी संचालकांनी विम्याचे अर्ज सादर करण्यात आले होते. मात्र, एमआरसाक (MRSAC) प्रणालीच्या सॅटेलाईट पडताळणीत संबंधित क्षेत्रावर केळीचे पीक नसल्याचे स्पष्ट झाले. एकूण २३ कोटी ६३ लाख रुपयांची केंद्र व राज्य शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कारवाईचा बडगा: कोणत्या सेंटरवर झाले गुन्हे?
याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत केवळ सीएससी केंद्र चालकांना जबाबदार धरत कारवाई केली आहे:
• चोपडा शहर पोलीस स्टेशन: ९ सीएससी चालक.
• आडावद पोलीस स्टेशन: ३ सीएससी चालक.
• चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन: १ सीएससी चालक.
यामध्ये अमोल भास्कर पाटील, सुदर्शन वासुदेव पाटील, नितीन भागवत माळी, जितेंद्र गुरुदास शिंपी, घनशाम अशोक भोई, पंकज नागेशराव सोनवणे, मनोज मुरलीधर पाटील, विनोद सुरेश जव्हागे (सर्व रा. चोपडा) आणि अविनाश विष्णू पाटील (चुंचाळे) अशा एकूण १३ जणांचा समावेश आहे.
प्रशासनाचा 'विश्वासघात'; बीएनएस कलमान्वये गुन्हे
शासनाचा विश्वासघात करून खोटे दस्तावेज खरे असल्याचे भासवल्यामुळे या संचालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३६, ३३७, ३४०, ३४२ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व सीएससी चालकांनी ऑक्टोबर २०२५ दरम्यान हे बनावट अर्ज सादर केले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
"केळी नसतानाही पीक विम्याचे बनावट अर्ज भरून शासनाची दिशाभूल करणाऱ्या सीएससी संचालकांवर ही मोठी कारवाई आहे. आता या संचालकांना पोलिसांच्या अटकेला सामोरे जावे लागणार की ते बचावासाठी काय कायदेशीर पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."
0 टिप्पण्या