चोपडा (प्रतिनिधी): खानदेशातील वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेल्या गरताड (ता. चोपडा) येथे उद्यापासून ७७ व्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा मंगलमयी वातावरणात प्रारंभ होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीराम जन्मोत्सव आणि कीर्तन सोहळा अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
वारकरी शिस्तीचा वारसा: ७७ वे वर्ष
गरताड येथील हा सप्ताह खानदेशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा सोहळा मानला जातो. विशेष म्हणजे, गेल्या ७६ वर्षांपासून वारकरी संप्रदायाचे सर्व नियम आणि दंडक पाळून हा सोहळा अविरतपणे सुरू आहे. यावर्षी सप्ताहाचे ७७ वे वर्ष असून, तिथीच्या क्षयामुळे उद्यापासून या कीर्तन यज्ञाल सुरुवात होत आहे.
नित्यनेम आणि विशेष योग
सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ९ ते १० प्रवचन, सायंकाळी ४ ते ६ प्रवचन व हरिपाठ आणि रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होतील. यावर्षीच्या सप्ताहात प्रभू श्रीराम नवमी, महाबली हनुमंत जयंती, प्रभू महावीर जयंती आणि एकादशी व्रत असा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
श्रीराम जन्मोत्सव सोहळा: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुपारी १२ वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
कीर्तन सेवा देणारे मान्यवर
सप्ताहात ह.भ.प. शुभम महाराज (मंदाणेकर), ह.भ.प. आकाश महाराज (जळकेकर), ह.भ.प. योगेश महाराज (चिंचोलीकर), ह.भ.प. दिपक महाराज (रेलकर), ह.भ.प. गुलाब नाना महाराज (लोणकर), ह.भ.प. जितेंद्र महाराज (म्हसावदकर) आणि ह.भ.प. अंकुश महाराज (मनवेलकर) यांची कीर्तन सेवा होणार आहे. ३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.
ग्रामस्थांचे नियोजन
या सोहळ्यासाठी समस्त गरताड ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविक परिश्रम घेत आहेत. गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि विणेकरी यांच्या साथीने हा भक्तिसोहळा रंगणार असून, परिसरातील सर्व भाविकांनी या ज्ञानांमृत श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या