भुसावळ: 'माउली प्लाझा'मधील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाईचे संकेत; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

Advertisement

भुसावळ: 'माउली प्लाझा'मधील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाईचे संकेत; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

भुसावळ: 'माउली प्लाझा'मधील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाईचे संकेत; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश


भुसावळ (प्रतिनिधी):
शहरातील गट क्र. ११५/१/अ येथील 'माउली प्लाझा' अपार्टमेंटवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत भुसावळचे उपविभागीय अधिकारी (SDO) यांनी आता कडक पवित्रा घेतला असून, याप्रकरणी चौकशी करून तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
येथील रहिवासी श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी दि. २६/०३/२०२६ रोजी ई-मेलद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. माउली प्लाझा अपार्टमेंटवर नियमबाह्यरीत्या मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती तक्रारीत व्यक्त करण्यात आली होती.

प्रशासनाची कडक भूमिका
या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दोन स्वतंत्र पत्रे काढून संबंधित विभागांना व कंपनीला धारेवर धरले आहे:

१. तहसीलदारांना आदेश: पहिल्या पत्रानुसार, तहसीलदारांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

२. इंडस टॉवर्स लिमिटेडला नोटीस: दुसऱ्या पत्राद्वारे 'इंडस टॉवर्स लिमिटेड' (पुणे) च्या व्यवस्थापकांना कडक समज देण्यात आली आहे. टॉवरशी संबंधित सर्व करारनामे, परवाने आणि ना हरकत दाखले (NOC) घेऊन दि. १०/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हजर न राहिल्यास कठोर कारवाई
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी दिलेल्या वेळेत पुराव्यासह हजर राहिले नाहीत, तर त्यांचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून टॉवर हटवण्याची व पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.

प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील इतर अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य टॉवर उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता १० एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या