संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी.
भुसावळ (प्रतिनिधी):
शहरातील जामनेर रोडवरील श्रद्धा नगर परिसरातील 'ओपन स्पेस'च्या जागेवर बेकायदेशीररीत्या बांधकाम करून रहिवाशांच्या हक्काच्या जागेवर गदा आणली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवासी प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यांसह सविस्तर लेखी तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार प्रमोद पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हे क्र. ११५/१/अ मधील शासकीय 'ओपन स्पेस'च्या जागेवर देवस्थान च्या ९०% जागेवर 'श्री समर्थ महिला बहुद्देशीय संस्था' संचलित श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या नावाने संस्थेने व्यापलेले आहे. मंदिराबाबत विरोध नसल्याचे स्पष्ट करत पाटील यांनी म्हटले आहे की, बिल्डर आणि संबंधित संस्थेने मोकळ्या जागेचा गैरवापर केल्यामुळे स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना फिरण्यासाठी किंवा खेळासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.
तक्रारीतील प्रमुख मुद्दे:
तक्रार अर्जात संस्थेच्या कामकाजावर खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत:
• अनधिकृत बांधकाम: ओपन स्पेसवर बांधकाम करण्यासाठी कोणत्या प्राधिकरणाची परवानगी घेतली?
• आर्थिक व्यवहार: देणगी आणि वर्गणीद्वारे गोळा होणाऱ्या रकमेचे ऑडिट झाले आहे का?
• गोपनीयतेचा भंग: परिसरात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे महिलांच्या खासगी आयुष्यावर (Privacy) गदा येत असल्याचा आरोप.
• अतिक्रमण: मोकळ्या जागेत गोठा आणि सिमेंट साठवण्यासाठी गोडाऊन उभारण्यात आले आहे, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
• पारदर्शकता: संस्थेचे संचालक मंडळ कोण आहे आणि दानपेटीतील रकमेचा हिशोब काय, याची चौकशी करण्याची मागणी.
"धर्मविरोधी" असल्याचा खोटा प्रचार
"मी कायदेशीर हक्कासाठी लढत असताना, मला भावनिक स्तरावर 'धर्मविरोधी' ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा विरोध मंदिराला नसून, ओपन स्पेसच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना आणि अतिक्रमणाला आहे," असे प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
या प्रकरणी संबंधित संस्थेला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात यावी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी आणि दोषी आढळल्यास बिल्डर व संस्था चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या