चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

Advertisement

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चोपडा (प्रतिनिधी):संदीप पाटील
शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून भरवस्तीत घरफोड्यांचे सत्र सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अशोक नगर, तारामती नगर आणि इंदिरा नगर भागात चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप तोडून तब्बल ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिताबाई ईश्वर धनगर (वय ४९, रा. अशोक नगर) या दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटातून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवजी चोरून नेला.

इतर भागातही चोरट्यांचा हातसाफ
केवळ अनिताबाईंच्याच घरी नव्हे, तर परिसरातील तारामती नगर आणि इंदिरा नगर भागातील इतर बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलीस तपास सुरू
अनिताबाई धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.
​भरवस्तीत आणि भरदिवसा झालेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या