श्री समर्थ महिला बहुद्देशीय संस्थेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; प्रमाणित नक्कलांसाठी धर्मदाय आयुक्तांकडे धाव
भुसावळ (प्रतिनिधी): येथील ‘श्री समर्थ महिला बहुद्देशीय संस्था (रजि. नं. महा/८९१८)’ या संस्थेच्या एकूणच कारभाराबाबत आणि पारदर्शकतेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संस्थेच्या स्थापनेपासूनचे अहवाल, मालमत्तेचा तपशील आणि निवडणूक प्रक्रियेत नेमकी काय पारदर्शकता आहे, याची शहानिशा करण्यासाठी भुसावळ येथील जागरूक नागरिक प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त, जळगाव यांच्याकडे रीतसर अर्ज करून संस्थेच्या सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित नक्कलांची (Certified Copies) मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर संस्था भुसावळ परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचा दावा करते. मात्र, या संस्थेच्या अंतर्गत कामकाजात, विशेषतः संत गजानन महाराज देवस्थान चालविण्याबाबतच्या परवानगीत आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनात गोपनीयता पाळली जात असल्याची चर्चा नागरिक स्तरावर होती. ही बाब लक्षात घेऊन प्रमोद पाटील यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० अंतर्गत ही माहिती मागवली आहे. प्रमोद पाटील यांनी आपल्या अर्जात एकूण १३ मुद्द्यांवर सविस्तर माहिती मागितली आहे. यामध्ये प्रामुख्याने: • संस्थेची मूळ घटना आणि नियमावली (Bye-laws). • देवस्थान चालविण्याबाबत धर्मदाय आयुक्तांची अधिकृत परवानगी. • स्थापनेपासूनचे सर्व वार्षिक अहवाल आणि ऑडिट रिपोर्ट्स. • गेल्या ५ वर्षांतील निवडणूक प्रक्रिया, मतदान आणि विजयी उमेदवारांची यादी. • संस्थेच्या नावे असलेली जंगम व स्थावर मालमत्ता (अनुसूची-१ नुसार). • कर्मचाऱ्यांचे वेतन, बँक व्यवहार आणि कमर्शियल गॅस कनेक्शनचा वापर. संस्थेच्या माध्यमातून राबविले जाणारे आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रम कागदावरच आहेत की प्रत्यक्ष जमिनीवर, याचा शोध घेण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे. "मी एक जागरूक नागरिक म्हणून जनहितासाठी ही माहिती मागत असून, संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता असावी हाच यामागचा मुख्य उद्देश आहे," अशी प्रतिक्रिया प्रमोद पाटील यांनी दिली आहे. आता धर्मदाय आयुक्त कार्यालय या अर्जावर काय कारवाई करते आणि संस्थेचा 'कच्चा चिठ्ठा' बाहेर येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला सहमती देता.
0 टिप्पण्या