गोरगावले बु. प्राथमिक आरोग्य केंद्रात 'एचपीव्ही' (HPV) लसीकरणाचा शुभारंभ; २३ मुलींनी घेतला लाभ
चोपडा (प्रतिनिधी):
महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले बु. (ता. चोपडा) येथे उत्साहात करण्यात आला. या सत्रात पहिल्याच दिवशी २३ मुलींनी लसीकरण करून घेत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोरगावले बु. ग्रामपंचायतीच्या प्रशासक तथा माजी सरपंच सौ. सुरेखा कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
प्रशासकीय मार्गदर्शन व उपस्थिती
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी धानोरा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरीशंकर शिसोदिया, गोरगावले बु. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश निळे आणि डॉ. शर्वरी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
HPV लसीकरणाचे महत्त्व
कार्यक्रमादरम्यान डॉ. दिनेश निळे यांनी उपस्थित पालक व मुलींना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की:
• HPV हा विषाणू प्रामुख्याने गर्भाशय मुखाच्या कर्करोगास (Cervical Cancer) कारणीभूत ठरतो.
• हा कर्करोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही लस अत्यंत प्रभावी आहे.
• १५ वर्षापर्यंतच्या मुलींना ही लस दिल्यास त्यांची भविष्यातील गंभीर आजारांपासून सुरक्षा होते.
यांचा राहिला सहभाग
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, लसीकरण सनियंत्रण अधिकारी दिलवर वडवी, आरोग्य सहाय्यक रविंद्र काटे, सुनील महाजन, आरोग्य सहाय्यिका सौ. ज्योती न्हायदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुणाल शिंदे, औषध निर्माण अधिकारी सुयश बोरसे, आरोग्य सेवक डॉ. महेंद्र पाटील, दिनकर वाघ, अनिल माळी, कनिष्ठ सहाय्यक विशाल देवराज, आरोग्य सेविका माधुरी बडगुजर, दिग्विजय पाटील, रविंद्र पवार, डाटा ऑपरेटर संतोष वाघ, गटप्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.
या लसीकरण सत्रामुळे परिसरात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या